शेवग्याचे रोप लावल्यानंतर चांगले व्यवस्थापन असल्यास दोन ते तीन महिन्यांत तीन ते चार फुटांपर्यंत झाडांची उंची वाढते. शेवग्याचे रोप तीन ते चार फूट वाढल्यानंतर त्याचा तीन फुटांवर शेंडा छाटावा. कारण शेंडा छाटला नाही तर ते सरळ उंच वाढते. रोपाचा शेंडा छाटल्यानंतर खोडावर तसेच शेंड्याजवळून त्याला फांद्या फुटतात. सर्व साधारणपणे प्रत्येक खोडावर चार ते पाच फांद्या ठेवाव्यात. शेवग्याची लागवड केल्यानंतर पाच ते सहा महिन्यांपासूनच फुले येण्यास सुरवात होते. झाड लहान असल्याने, तसेच त्याची शाखीय वाढ जास्त होत असल्याने सुरवातीची फुले गळतात. क्वचित एखाद्या फुलांचे रूपांतर शेंगेत होते. अर्थात नंतरच्या फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये होते. फुलधारणा होत असताना फांदीवर प्रत्येक पानाच्या देठाजवळ फुलांचा गुच्छ येतो आणि त्यापासून फळधारणा होते. फुलापासून शेंगा तयार होण्याचे प्रमाण तीन ते पाच टक्के असते. रोपांची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन असल्यास पाच ते सहा महिन्यांनी फुले येऊन आठ ते नऊ महिन्यांत पहिले उत्पादन मिळते.

पीक व्यवस्थापन

 1. जून-जुलैमध्ये लागवड केलेल्या झाडाचा पहिला बहर मार्च-एप्रिल या महिन्यांत संपतो. त्यानंतर झाडाची छाटणी केली पाहिजे. छाटणी करताना प्रत्येक फांदीवर तीन ते चार डोळे ठेवून, म्हणजेच खोडापासून सर्वसाधारणपणे दोन ते तीन फूट लांबीवर फांदी कापावी. म्हणजेच छाटणीनंतर खोडावर चार ते पाच फांद्या दोन ते तीन फूट लांबीच्या ठेवाव्यात.
 2. दरवर्षी छाटणी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या शेवटी तापमान कमी झाल्यानंतरच करावी. तसेच छाटणी लवकर किंवा उशिरा करून बाजारपेठेच्या मागणीनुसार शेंगांचे उत्पादन घेता येते. वर्षांतून एकदाच छाटणी करावी.
 3. छाटणी झाल्यानंतर आलेल्या फांद्या जास्त वाढत असल्यास त्यांचा वरचा शेंडा खुडावा, जेणेकरून झाडाची उंची वाढणार नाही, तसेच शेंगा झाडाच्या खालच्या बाजूला येतील. छाटणी करताना झाडाची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
 4. छाटणीनंतर 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड आणि दोन मि.लि. क्‍लोरपायरिफॉस प्रति लिटर पाणी मिसळून फवारणी करावी.
 5. शेवग्याला वर्षातून दोनदा बहर येतो, त्यामुळे प्रत्येक बहर घेताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे. छाटणी झाल्यावर मात्र वर्षातून एकदा शेणखत वापरावे. शेणखताबरोबरच रासायनिक खतांचा वापर करावा. एकरी माती परीक्षणानुसार 50 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे. त्यानंतर 30 ते 40 दिवसांनी परत एकदा एकरी 50 किलो युरिया द्यावा. जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढ बघून युरिया खताचे प्रमाण कमी-जास्त करावे.
 6. पहिला बहर निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात. अशावेळी परत एकरी 50 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट आणि 50 किलो पोटॅश द्यावे. सदरचे खत जमिनीमध्ये मिसळले जाईल याची काळजी घ्यावी. पहिल्या खताच्या हप्त्यानंतर पुन्हा 30 ते 40 दिवसांनी एकरी 50 किलो युरिया द्यावी.
 7. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्यास शेंगांचे प्रमाण, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र खताचा वापर कमी करावा. शेंगांची फुगवण कमी होत असल्यास, तसेच फुलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढविण्यासाठी स्फुरद खतांचा जास्त वापर करावा.
 8. शेवगा पिकावर रोग-किडींचे प्रमाण कमी असते. परंतु खतांचा असंतुलित वापर किंवा आरोग्य व्यवस्थापनामुळे रोग-किडींचे प्रमाण वाढू शकते. शेवग्यावर मुख्यतः वाळवी, पाने खाणारी अळी किंवा शेंडा कुरतडणारी अळी, तसेच करपा व डाऊनी रोगांचा प्रादुर्भाव होतो. कीड, रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणाचे उपाय करावेत.
 9. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. मूळकूज विशेषतः भारी जमिनीत येते. फ्युजेरिअम या बुरशीमुळे मूळकूज होऊन रोपे लहानपणीच मरतात. तसेच मोठी झाडेही वाळतात. त्यासाठी लागवडीच्यावेळी खड्डा भरताना शेण खताबरोबर 10 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळावी.
 10. बऱ्याचदा फुलांची गळ होते. फुलगळ विशेषतः वातावरणातील बदलामुळे, जमिनीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे होत असते. हे लक्षात घेऊन कीड, रोग नियंत्रणाचे उपाय करावेत. फुलांची गळ थांबविण्यासाठी पाच ग्रॅम 00ः52ः34 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

One thought on “व्यवस्थापन शेवगा लागवडीचे

 1. फुलापासून शेंगा तयार होण्याचे प्रमाण तीन ते पाच टक्के असते. रोपांची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन असल्यास पाच ते सहा महिन्यांनी फुले येऊन आठ ते नऊ महिन्यांत पहिले उत्पादन मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *